॥ ग्रामदैवत – काही ऐतिहासिक सत्य ॥

नोव्हेंबर 28, 2012

॥ ग्रामदैवत – काही ऐतिहासिक सत्य ॥

विनायक भट्ट ठकार पुण्यात आले व ते चतु:श्रृंगीजवळील पार्वतीनंदनाच्या देवळात अनुष्ठानाला बसले तिथे त्यांना श्री गणेशाचा दृष्टांत झाला व येथून जवळच ओढ्याजवळ शमीवृक्षाखाली “मी  आहे” असा साक्षात्कार झाला.तदनंतर त्यांना श्री गजाननाची स्वयंभू मूर्ती मिळाली.

ही निव्व्ळ एक दंतकथा असून , तिच्यात काकणभरही तथ्य नाही.

गणेशाला निजामशाहीत दिल्या गेलेल्या सनदीचे पत्र आजही उपलब्ध आहे. निजामशाहीतील हे फर्मान आहे. हे अस्स्ल खुर्दखत आहे.दुर्मिळ अशी ही सनद आधीच्या दोन पत्रांची नक्कल असावी. हे फर्मान कधीही मोडले गेले नाही.

लढाई, आक्रमणे यांतदेखील हे फर्मान कधी मोडले गेले नाही व श्री मोरयास याची झळ कधीच पोचली नाही.

हे शिक्क्याचे फर्मान याची मूळ प्रत असून, प्रत्येक वर्षी ते पुढे चालू करण्यास “दुमाला” सांगुन फर्मान मागू नका, नकल “तालीक” करा असा आशय त्यात आहे.

निजामशाहीतील हे अस्स्ल पत्र मुद्रांकीत असून ही दुर्मिळ सनद, देवस्थानचे अस्तित्व किती जुने आहे ह्याचा एक भक्कम पुरावा आहे.

 

या सनदीइतकाच अस्स्ल, व जुना पुरावा म्हणजे दिनांक १६ मार्च १६४७ रोजी, प्रत्यक्ष श्री शिवाजी महाराजांनी लिहिलेले मोडी लिपितील पत्र !

ORIGINAL MODI LETTER

या पत्रातील सुरुवातीचा मजकूर पर्शियन आहे. हे द्वैभाषिक फर्मान आहे.

आठ ओळींच्या या पत्रावर “प्रतिपच्चंद्र” ही अष्टकोनी शिवमुद्रा अत्यंत सुस्प्ष्ट आहे. अखेरीस “मर्यादेयम विरजते” ही मोर्तब आहे. पत्राच्या वर सुरुवातीला “श्री मोरया” अशी अक्षरे आहेत.

पुणे परगण्याच्या कार्यात मावळातील माणतर्फे गावातुन रोज अर्धा शेर तेल वजनी हे नंदादीपास, असा श्री शिवाजी महाराजांनी मावळच्या कारकुनास काढलेला हा हुकुम आहे.

यानंतरही पेशवाईच्या काळात, श्रीमंत बाजीराव तसेच त्यानंतर सवाई माधवराव यांच्या कारकीर्दीतही या मोरयाचे तितकेच महत्त्व होते, हे त्या काळातील पत्रांतुन जाणवते.

देवाची पूजाअर्चा, या खर्चासाठी दरमहा ८ रुपये ५ आणे ३ पैसे याप्रमाणे दरसाल १०० रुपये, असा हुकुम त्यावेळ्च्या एका पत्रात आढळतो

 श्रीमंत नानासाहेब पेशवे यांच्यातर्फे भाद्रपद उत्सवाला मिळणारी रुपये १५६ ही मदत आजही पर्वती देवस्थान यांजकडून चालू आहे.

Advertisements

॥ ग्रामदैवत ॥

नोव्हेंबर 16, 2012

॥ ग्रामदैवत ॥

कसबा गणपती हे अखिल पुण्यनगरीचे ग्रामदैवत. चारशेपेक्षा अधिक वर्षांपासुन अस्तित्वात असलेले !

कसबा गणपती आणि तांबडी जोगेश्वरी ही पुण्याची दोन ग्रामदैवतं!

मुळा, मुठेच्या संगमावर वसलेल्या पुण्यनगरीतील हे गणेश दैवत सुमारे चारशे वर्षांपूर्वीचे, म्हणजे अगदी पुरातन  असल्याचे पुरावे उपलब्ध आहेत.

मंगलकार्य असो, लग्न , मुंज असो वा इतर कोणताही धार्मिक कार्यक्रम असो, घरातील पहिली अक्षता जाते ती कसब्याच्या गणपतीला !

हे जयति गजानाना, कार्य निर्विघ्नपणे सिद्धिस जाऊ दे ! अशी प्रार्थनाही केली जाते.

मंदिरात गणेशजन्माचा उत्सव वर्षातून तीनदा साजरा करण्यात येतो.

या गजाननाच्या पूजनाचे भाग्य अनेक पिढ्यांपासून ठकार घराण्याकडे वंशपरंपरेने चालत आलेले आहे.

ठकार घराणे मूळचे विजापूरचे ! सुमारे चारशे वर्षांपूर्वी विजापूर जिल्ह्यातल्या इंडी तालुक्यातील आठ ब्राह्मण घराणी तत्कालीन राज्यकर्त्यांच्या जाचास कंटाळून, आपला मुलुख सोडुन निघाली.

ठकार, ढेरे, उपाध्ये, धर्माधिकारी, कलंगे, निलंगे, वैद्य, , कानडे अशी ही आठ कुटुंबे !

ही देशस्थ ब्राह्म्ण मंडळी मार्गक्रमण करीत असताना त्यांना नगर जिल्ह्यात अडविण्यात आले.

यातील ढेरे कुटुंबातील एका व्यक्तीला बाटविण्यात आले.

त्यानंतर ही मंडळी मजल दर मजल करीत पुण्यात पोचली व नदीकाठी असलेल्या भागात स्थायिक झाली. हीच आजची कसबा पेठ !

यातील कलंगे आणि निलंगे सोडून बाकी सर्व सहा घरे आज शेजारी शेजारी आहेत.

या प्रवासात ठकारांपैकी श्री. विनायकभट्ट ठकार य़ांच्याकडे त्यांच्या नित्यपूजेतील, गजाननाची मुर्ती होती. तांब्याच्या आकाराएवढी ही मूर्ती !

विनायकभट्टांनी आपल्याच घरात तिची प्रतिष्ठापना करुन तिचे नित्य पूजन सुरु केले.

आज अनेक वर्ष केलेल्या सततच्या शेंदुरलेपनामुळे मुळ मूर्ती झाकून गेली आहे. आता ती जवळपास तीन फुट लांब व साडेतीन फुट रुंद अशी दिसते.