कसबा गणपती मंदीर

डिसेंबर 1, 2012

कसब्यातील फणी आळीत मंदीराचे प्रवेशद्वार असून ते पूर्वाभिमुख  आहे.

श्री गजाननाची मूर्ती उत्तराभिमुख आहे. मूळ मूर्तीची स्थापना केलेला गाभारा दगडी आहे जो राजमाता जिजाऊसाहेबांनी बांधुन दिला आहे व आजही जसाच्या तसा आहे.

असे म्हणतात की जेव्हा शिवाजीमहाराज औरंगजेबाच्या कैदेत होते त्यावेळी, अत्यंत काळजीयुक्त मनाने विनायकभट्टांकडे भविष्य जाणण्यासाठी गेल्या.

विनायकभट्ट उत्तम ज्योतिषी होते. त्यांनी महाराज परत येण्याचा दिवस व वेळ अत्यंत अचूक सांगितली. तो पुढे अर्थातच बरोबर ठरला.

यामुळे अत्यंत संतुष्ट होऊन, विनायकभट्टांना काही हवे असल्यास सांगा, असे विचारले.

त्यावेळी, स्वत:साठी काहिही न मागता, माझ्या मोरयाला गाभारा बांधुन द्या, असे त्यांनी सांगितले.

या गाभा-यात अत्यंत पावित्र्याने , सोवळे नेसुनच प्रवेश करता येतो, मुर्तीला स्पर्श करता येत नाही.

या पहिल्या गाभा-याची मंडपी चांदीची आहे, शके १८३१ मध्ये बांधलेली आहे.

या मुख्य गाभा-याबाहेर दुसरा गाभारा आहे जिथून भक्त श्री मोरयाचे दर्शन घेऊ शकतात. ह्या गाभा-याची मंडपी शके १८४८ मध्येर रावबहादूर केंजळे यांनी बांधली आहे. असे सांगण्यात येते की, श्री. केंजळे यांनी नव्या पुलाचे कंत्राट घेतले होते परंतु कामात यश येत नव्हते व पुल सारखा पडत होता.

त्यावेळी त्यांनी श्री मोरयाला कार्यसिद्धीसाठी नवस बोलला व पुलाचे काम पूर्ण झाल्यावर त्यांनी ही चांदिची मंडपी बांधुन घेतली.

मुख्य प्रवेशद्वारात चांदीची महिरप असुन दोन्ही बाजुला संगमरवरी हनुमंत आणि गरुड आहेत.

तसेच जय-विजय यांची मोठी चित्रे आहेत जी, श्री. बाबासाहेब पुरंदरे यांच्या वडिलांनी काढलेली आहेत.

बाहेर सभामंडप आहे व दोन्ही बाजूस सुरुचे पाच महिरपदार खांब आहेत. मंदिराच्या वास्तूचा पुढचा भाग तीन मजली असून सर्वात वरच्या मजल्यावर नगारखाना आहे. पुर्वी येथुन रोज सनई-चौघडा वादन होत असे.

आजही काही विशेष दिवशी (जसे की भाद्रपद, माघ, ज्येष्ठ उत्सव) येथे सनईवादन होते.

Advertisements